पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लागोपाठ तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या घटकपक्षांच्या खासदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शाह केंद्रीय गृहमंत्री, राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री, एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्री, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्री तर नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातली पाच प्रमुख खाती ही भाजपकडेच ठेवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातही या पाच जणांकडे हीच खाती होती.
शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलं आहे. जेपी नड्डा यांना आरोग्यमंत्री करण्यात आलं आहे. निर्मला सितारमण यांच्याकडे अर्थ मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रीपद दिलं गेलं आहे. टीडीपीच्या राम मोहन नायडू यांना हवाई उड्डाण मंत्रालय देण्यात आलं आहे. किरण रिजीजू संसदीय कामकाज मंत्री असतील. हरदीप सिंग पुरींना पेट्रोलियम मंत्रिपद देण्यात आलं आहे.
एनडीएमध्ये सहभागी असलेली जेडीयू रेल्वे मंत्रालयासाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं, पण आता रेल्वेमंत्रीपद भाजपकडेच गेलं आहे. नितीन गडकरींच्या रस्ते वाहतूक मंत्रालयात अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांच्याकडे राज्यमंत्रीपद असेल.
तर मनोहरलाल खट्टर यांच्याकडे उर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय देण्यात आलं आहे. एनडीएचे घटकपक्ष असलेल्या जीतनराम मांझी यांना सुक्ष्म आणि लघू उद्योग मंत्रिपद देण्यात आलं आहे, हे पद आधी नारायण राणे यांच्याकडे होतं.
