मोठी बातमी! ‘या’ नामांकित पतसंस्थेत १७ कोटींचा अपहार, संचालकांसह १४ जणांवर गुन्हे दाखल

शिरुर शहरातील नामांकीत असणाऱ्या आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत तेथील संचालक मंडळ व लेखा परीक्षकांनी संगनमताने तब्बल सतरा कोटी रुपयांचा अपहार करुण ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणुक केल्याची खळबळजनक घटना घडली असून शिरुर पोलीस स्टेशनमध्ये पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदार पैसे ठेव म्हणून ठेवत असताना पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार चोरडिया यांसह संचालक मंडळाने पतसंस्थेतील तब्बल १६ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये आपल्याच नात्यातील लोकांना विनातारण कर्ज वाटप केले आहे. त्यांनतर सदर कर्जाची वसुली न करता बँकेचा तोटा असल्याचे दाखवले, दरम्यान सदर पतसंस्थेचे तत्कालीन लेखा परीक्षक यांना याबाबतची सर्व माहिती असताना देखील या बाबी वरिष्ठ कार्यालयांना कळवल्या नाही.संचालक मंडळाला साथ देऊन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे सहकारी संस्था पुणे व द्वितीय अप्पर विशेष लेखा परीक्षक संजयकुमार सखाराम मुंडे (वय ५६, रा. लेअर टाऊन अमेनोरा मागे हडपसर पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार पोपटलाल चोरडीया, संचालक प्रवीण चंपालाल चोरडीया, सनीधरमचंद चौरडीया, सविता अभयकुमार चोरडीया, सुजाता नितीन चोरडीया, प्रीतम प्रवीण चोरडीया, पारसबाई पोपटलाल चोरडीया, चंपालाल बुधमल चोरडीया, सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडीया (सर्व रा. आनंद सोसायटी शिरूर ता. शिरूर जि. पुणे) मुरसलीन वाहिद मोहम्मद (रा. सफरपूर राजपुतान ता. रूड जि. हरिद्वार राज्य उत्तराखंड) आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक शांताराम गंगाधर देवकर (रा. तीनचारी वस्ती कोल्हार बुद्रुक ता. राहता जि. अहमदनगर), सनदी लेखा परीक्षक सरिता ब्रिजमोहन सिंह (रा. व्सिहाल रेसिडेन्सी कासारवाडी पुणे), नागेंद्र एच सोरटे, अजय एच सोरटे दोघे रा. दापोडी पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर हे करत आहे.

Leave a Comment