दहावी – बारावीचे निकाल ‘या’ महिन्यात लागणार…..

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. आज (शनिवारी) दहावीच्या परीक्षेचा शेवट आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु असून जुन्या पेन्शनच्या संपामुळे बारावीच्या निकालास थोडा विलंब लागणार आहे.

बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे.

यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीचे जवळपास १४ लाख विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे मागील वर्षी ‘शाळा तेथे केंद्र’ अशी परीक्षा पार पडली होती. त्यावेळी १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

पण, हुशार, होतकरू मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ लागू केला होता. त्यामुळे शाळांमधील सामुहिक कॉपी प्रकरणांना निश्चितपणे आळा बसला. काही अपवाद वगळता पेपर फुटीचे प्रकार देखील नियंत्रित आले आहेत.

जिल्हा परिषद, महसूल यंत्रणेच्या मदतीने शिक्षण विभागाने परीक्षा व्यवस्थित पार पाडली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांनी परीक्षेचे अचूक नियोजन केले होते. त्यामुळेच जुन्या पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्वच शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. तरीसुद्धा परीक्षा सुरळीत पार पडली.

आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु असून एका शिक्षकाला विषयनिहाय किमान दोनशे उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होऊन जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात दोन्ही निकाल जाहीर होतील, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment