उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरूवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. हा निवडणुकीपुरता जुमला असल्याची टीका विरोधक करत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
पावसाचे दिवस असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. एक दिवस अगोदर सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा. यात्रेचे नाव जन सन्मान का ठेवले हे समजून घ्या. महिलांसाठी, युवांसाठी, शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या माध्यमातून नवीन योजना आणल्या आहेत. बजेट सादर करण्यापूर्वी जनतेच्या भावना समजून घेतल्या. या योजनेचा लाभ तुम्हाला होणार आहे, तुमची सेवा करणे आमचे काम आहे. आम्ही राजे नाही जन सेवक आहोत जनतेचे सेवक आहे. माझ्या राजकीय आयुष्याला 33 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतके वर्ष समाजाचे काम करत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. विविध योजना आणल्या, शेतकऱ्यांना सावकार मुक्त केलं. शून्य टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना पैसे दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार?
रक्षा बंधननिमित्त माझी लाडकी बहिण योजना दिली आहे. जे नियमात बसतात त्या महिलांना 17 तारखेपर्यंत पैसे मिळतील. सहा हजार कोटींच्या फाईलवर सही करून तुम्हाला भेटायला आलो आहे. विरोधक आमच्यावर टीका करत आहे. मात्र, ही योजना तात्पुरती नाही महायुतीचे सरकार आणण्यासाठी तुम्ही पाठबळ द्या सहकार्य द्या. ही योजना 5 वर्ष चालेल हा अजित दादांचा वादा आहे. कुठे काटकसर करायची आणि बचत करायची हे आम्हाला माहीत आहे.
