केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये वनराई फाउंडेशनच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात नितीन गडकरींनी आपल्या निवृत्तीविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे.त्यांनी मी नाही तर दुसरा कोणी तरी निवडून येईल असे म्हणत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले असल्याचे म्हटले जात आहे.
वनराई फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या राजकीय निवृत्तीविषयी विधान केले आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना, “लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. कोणतरी नवीन येईल,” असे म्हणत गडकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुढे बोलताना गडकरींनी “राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीति म्हणजे लोकनीति, धर्मनीति आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे,” असे म्हटले आहे.
निसर्गातील बदलाविषयी बोलताना गडकरींनी “जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर, या क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे. मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यातही याच क्षेत्रात जोमाने काम करणार. कारण, याने भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागाचाही चेहरामोहरा बदलू शकतो,” असे म्हटले आहे.
