राज्यात 1 एप्रिलपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (31 मार्च) विजांच्या दरनिश्चितीबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे मार्च एंडलाच ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (MERC)जनसुनावणी पार पडली आहे. शुक्रवारी 31 मार्चरोजी वीज नियामक आयोग याबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे राज्यात वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटण्याची शक्यता आहे.
राज्यात नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियामक वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी आयोग आपला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरणने 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी 67 हजार कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीजेच्या दरात प्रतियुनिट अडीच रुपयांची वाढ होणार असल्याचा दावा ग्राहक संघटनांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने केवळ एक रुपया दरवाढ होईल, असे सांगितले आहे.
महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले की, तूट भरून काढण्यासाठी 2023-24 व 2024-25 या दोन आर्थिक वर्षांत दरवर्षी 14 आणि 11 टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित आहे. ती एक रुपयाच्या जवळपास आहे. तसेच स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचाही समावेश केलेला आहे
