अहमदनगर : एकीकडे आज देशभरात लाडक्या गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जात आहे. तर दुसरीकडे अहमदनगर येथील पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काल दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) मिरवणुकीत त्यांनी डान्स केला होता. मिरवणूक संपून घरी जाताच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
