बदलापूर येथील प्रतिथयश शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांनी केला. अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून घेऊन येत असताना त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार केला.
त्यानंतर उत्तरादाखल झालेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला. यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. गृहखात्याच्या हलगर्जीपणामुळे हे घडल्याचं शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांनी म्हटलं. या सगळ्याला एक दिवस उलटत नाही तोच देवेंद्र फडणवीस यांचं हातात रिव्हॉल्वर असलेलं आणि बदलापुरा असं लिहिलेलं पोस्टर झळकलं.
काय आहे बदलापुराच्या पोस्टरमध्ये?
मुंबईतल्या काही भागांमध्ये ‘बदलापुरा’ हे लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर ‘बदला पुरा’ असं लिहण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. दुसरीकडे या पोस्टरवरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका सुरु केली आहे.
