अहमदनगर(DSNews24/किरण पुरी) जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून पारनेर तालुका ओळखला जातो. गेल्या ५० वर्षांपासून पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नावर विविध आंदोलने केली गेलीय. तसेच मोठ्या प्रमाणात राजकारण देखील होत आहे. मात्र आजपर्यंत या पाणी प्रश्नावर कुठलाही तोडगा न निघाल्याने दुष्काळी भागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहिले आहे. मात्र पुन्हा याच पाणी प्रश्नावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने एक मोठ पाऊल उचललय. पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर २४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केलंय. मात्र एवढा गंभीर आणि जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्न असताना गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी साथे फिरकले देखील नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
तसेच गेल्या तीन दिवसांपासून कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याने अखेर चौथ्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे यांनी आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन वेगळ वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण उपोषणस्थळी विविध संघटनांसह राजकीय नेत्यांनी भेटी देण्यास सुरुवात केलीय. तसेच लवकरात लवकर उपोषण कर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाच इशारा यावेळी काही नेत्यांनी दिलाय. त्यामुळे आगामी काळात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, निलेश लंके प्रतिष्ठानचे ॲड. राहुल झावरे, माजी नगराध्यक्ष विजू औटी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अनिल शेटे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किसन चौधरी, कामगार सेनेचे डी के पांढरे पाटील, शिवबा संघटना, पाडळी रांजणगाव ग्रामपंचायत आदिंंनी जाहीर पाठिंबा दिला.
तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी उपोषणकर्ते संतोष वाडेकर यांनी केलीय. तसेच जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे यावेळी श्री. वाडेकर यांनी सांगितले.
या मागणीसाठी सुरू आहे उपोषण…
पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून नगर जिल्हयातील दुष्काळी भागाला देण्यात यावे, कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहाजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वीन कराव्यात, डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अटी, शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे ५० हजारांचे अनुदान ठराविक शेतकऱ्याऱ्यांना मिळाले, उर्वरीत शेतकऱ्यांना ते मिळावे. यासंबंधीच्या मागण्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आहेत.
