पारनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या आठ दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. तसेच प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही. तसेच उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याची भूमिकाच आता उपोषणकर्त्यांनी घेतलीय. त्यामुळे उपोषण लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे.
मात्र प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने शेतकरी संतोष दादाभाऊ वाबळे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीवर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाहीतर पारनेर तहसील कार्यालयात वार – गुरूवार दि. ३ / १० / २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे निवेदन तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना दिले आहे.
दरम्यान शेतकऱ्याने थेट आत्मदहनाचाच इशारा दिल्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसताच संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तसेच ज्या मागण्या संबंधित प्रशासनाच्या असून त्या अधिकाऱ्यांनी थेट उपोषणस्थळ गाठत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच सविस्तर चर्चा केली. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात माहिती दिली. त्यामुळे ज्या विभागासंदर्भात उपोषणकर्त्यांची मागणी आहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान उपोषणाला संपूर्ण तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.
