शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे. फुफुसला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
काल बुधवारी रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते दीर्घ आजारामुळे पुण्यात उपचार घेत होते. बुधवारी रात्री उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.
तसेच भोत्रा रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान, सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते.
याच काळात ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. 1995 आणि 1999 अशा दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदार पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कठीण काळातही ज्ञानेश्वर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाण्याने शिवसैनिकावर शोककळा पसरली आहे.
