महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा सपाटा लावला आहे. दि. १० ऑक्टोबर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ४० निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र या बैठकीला वादाचीही किनार असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीतून १० मिनिटांतच काढता पाय घेतला असल्याची माहिती काही वृत्तवाहिन्यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव आणल्यामुळे अजित पवार नाराज होते. मागच्या काही आठवड्यांमध्ये अर्थ विभागाकडून सरकारच्या प्रस्तावांना विरोध केला जात आहे. तसेच भाजपाच्या काही आमदारांना भूखंड वाटप करण्यासही अजित पवार यांनी विरोध दर्शविला होता.
या घटनेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत आता नेहमीच वाद होत असल्याचे समोर येत आहे. हे वाद राज्याच्या हितासाठी नसून हे स्वतःच्या हितासाठी, स्वार्थासाठी वाद सुरू आहे. तिजोरीत पैसे नसतानाही ८० निर्णय घेतले जात आहेत. अर्थविभागाला शिस्त लावण्याचे काम अजित पवारांनी अनेकदा केले आहे. मात्र आता अजित पवारांना बाजूला सारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अलीकडे अर्थखात्याची शिस्त बिघडवली जात आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्याला कंगाल करून सोडेल. त्यामुळेच अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून काढता पाय घेतला असावा.
