मुंबई : मराठी तसेच हिंदी आणि साऊथमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला. अजित पवार यांच्याहस्ते सयाजी शिंदे यांनी हाती मनगट बांधलं.
सयाजी शिंदे गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अनेक वर्ष सयाजी शिंदे राजकारणात उतरतील अशा चर्चा होत्या. अखेर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
नाव जरी मराठी असलं तरी अभिनयाचा ठसा त्यांनी महाराष्ट्रात आणि दक्षिण भारताच्या सिनेसृष्टीत उमटवला आहे. “अभिनेते तर आहे, आता उद्या ते नेते सुद्धा होणार आहे. लोकांचं दुःख कसं कमी होईल, त्यासाठी त्यांना काम करायचं आहे. सयाजी शिंदे यांनी मराठी आणि दक्षिण सिनेसृष्टीत चांगलं काम केलं आहे. रजनीकांत यांना तिकडची भाषा कशी समजत असेल ते मलाही काही कळत नाही. आता सयाजी शिंदे आहे, ते सुद्धा तिथे काम करताय,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
