गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक नेते प्रवेश करत आहेत. यावर शरद पवार यांनी राज्यात मागच्या दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील 80 टक्के लोक हे भाजपमधून आहेत, असे वक्तव्य केले. तर महाराष्ट्रातील सत्ता यांच्या हातून काढून घ्यावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले.
आता यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. विखे पाटील म्हणाले की, ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली. त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. मात्र त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. उद्याच्या विधानसभेत मोठे इनकमिंग भाजपात होईल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून येतीलच मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, असा पलटवार त्यांनी केला आहे. तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं.
तुम्ही काय परिवर्तन केलं. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. निळवंडे धरणाचे चार वेळा भूमिपूजन केले. समन्यायी पाणी वाटपाचे भूत देखील यांच्याच काळात राज्यावर आलं. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली.
