संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने रविवारी तातडीने महत्वपूर्ण बैठक बोलावल्याने पठार भागात एकच खळबळ उडाली होती. त्यातच साकूरमध्ये आज भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटील यांची जाहीर सभा होणार असून त्यापुर्वीच ठाकरे गटाने बोलाविण्यात आलेल्या बैठकीने कॉंग्रेसमध्ये देखील खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
या बैठकीसाठी शिवसेना व युवासेनेचे तालुकाप्रमुख, साकूर पठार भागातील सर्व गट प्रमुख, शाखा प्रमुख, गण प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, तसेच ठाकरे गटाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक व पठार भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र या बैठकीत महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष तालुका व स्थानिक पातळीवर साधी किंमत देत नसल्याने ठाकरे गटाची मोठी नाराजी दिसून आली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतच मोठी फुट झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडत थेट भाजपलाच पाठिंबा देण्याची चर्चा ठाकरे गटाच्या बैठकीत करण्यात आली. ठाकरे गटाच्या या बैठकीनंतर कॉंग्रेसमध्ये मोठी खलबते झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच आज साकूरमध्ये भाजपची जाहिर सभा असल्याने या सभेत काही कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे ठाकरे गटाच्या या बैठकीला मोठ महत्त्व निर्माण झाले आहे. ठाकरे गटाच्या या नाराजीचे पडसाद उमटल्याने कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आता यात लक्ष घातल्याची माहिती समोर आलीय.
नेमकं ठाकरे गटाच्या बैठकीत काय चर्चा झाली….
राज्यात महाविकास आघाडी बनल्यापासून तालुका व स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला कॉंग्रेसने कधीच महत्त्व दिले नाही. तरी देखील लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरेंच काम देखील शिवसेना म्हणूनच केलं. मात्र कॉंग्रेसने कधीच आघाडीचा धर्म पाळला नाही. कोणतेही उद्घाटन शुभारंभ असो फ्लेक्स वर साधा उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो देखील छापला नाही. विकासकामांच्या भुमिपुजनाला देखील कॉंग्रेसचे नेते बोलवत नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना म्हणून सोबत काम करायच का नाही? अशी चर्चा करत यापुढे पठार भागात एकत्रित काम करण्याचा निर्णय यावेळी ठाकरे गटाच्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच अस्तित्व दाखवल्यानंतरच किंमत कळते. मात्र आज ना घर की ना घाट की अशी परिस्थिती स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची निर्माण झाली. राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच नाही. म्हणून ठाकरे गटाची मोठी फरफट झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काम करायच का नाही? अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत साकूर गटात एक जागा शिवेसेनेलाच मिळालीच पाहिजे. कारण ४० वर्षांत कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर कोलून दिल. त्यामुळे ठाकरे गटाला कॉंग्रेसचा कधीच फायदा झाला नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत योग्य वेळीच भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच संगमनेर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुजय विखे पाटील तिकीट मिळाल तर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. सुजय विखे यांना जरी भाजपकडून तिकीट मिळाल नाही, तरी जो भाजपचा उमेदवार असेल त्यावेळी देखिल योग्य भूमिका स्पष्ट करण्याची चर्चा बैठकीत करण्यात आली.
