संगमनेर – आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील संगमनेरमध्ये वेगळाच राडा झाल्याची बातमी समोर आलीय. ठाकरे गटाच्या माजी शहरप्रमुखाने भाजपचे शहराध्यक्ष यांना मारहाण केली. त्यामुळे संगमनेरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठाकरे गटा’च्या पदाधिकाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी संगमनेर पोलिसांकडे केली.
विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. संगमनेर मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित उमेदवाराने अर्ज भरला. या दरम्यान, भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मारहाण केल्याची घटना घडली. ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला.
हा सर्व प्रकार संगमनेरच्या प्रशासकीय भवनाजवळील एका चहाच्या टपरीवर झाल्याचे सांगितले जाते. भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले बसलेले असताना अमर कतारी यांनी पाठीमागून येत काहीही न बोलता त्यांना मारहाण केली. यात गणपुले यांच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली. गणपुले यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी पोचले. त्यानंतर काही वेळातच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पोलिस ठाण्यात येत या घटनेत कडक कारवाईची मागणी केली. या प्रकारामुळे संगमनेर शहरात पुन्हा काही काळ तणावाचे वातावरण होते.
श्रीराम गणपुले यांनी तक्रारीत अमर कतारी याने मागून घेत मानेवर चापटीने मारल्याचे म्हटले आहे. भाजपच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची खबर वाऱ्यासारखी संगमनेर शहरात पसरऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. मंत्री विखेंनी संगमनेर पोलिसांकडे याबाबत कडक कारवाईची मागणी केली. मंत्री विखे यांनी चिखली जळीत प्रकरणातील आरोपी शहरात खुलेआम फिरत असतानाही अद्याप अटक का होत नाही, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांना केला.
