संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा धक्कादायक पराभव झाला. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार यांनी दुःख व्यक्त केल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.
सत्यजीत तांबे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांच्या भेटीनंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की,अजितदादांनी मला विशेष करून विचारलं की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला? काय कारणे असावेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विशेष दुःखही व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा सीनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा हे सर्व वरिष्ठ नेत्यांना गरजेचा होता.
बाळासाहेब थोरात यांची सभागृहातली कमी निश्चितच सर्व नेत्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरचा निकाल धक्कादायक आहे. 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केल असेल ते का केलं असेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू, असे देखील सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
