विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल हे राज्यासाठी धक्कादायक होते. महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या धक्क्यातून मविआचे नेते सावरलेले दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठीही हे निकाल अतिशय धक्कादायक होते. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. यातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांसह अनेक मनसे नेत्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. मनसेचे मतांची टक्केवारीही घटल्यामुळे पक्षाची मान्यता राहणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगू लागली आहे. या मोठ्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकारी, नेते यांची एक आढावा बैठक घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, असे पत्र राज ठाकरे यांना लिहून अविनाश जाधव यांनी आपला ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
