वादळी वाऱ्यासह “या” जिल्ह्यात पावसाचा इशारा

मुंबई : चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहेत. महाराष्ट्रात आजपासून पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी यलो अलर्ट दिला आहे.

डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मध्य भारतापासून दक्षिणेत सर्वदूर डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

पुण्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या जवळपास असू शकतं. पुण्यात 4 आणि 5 डिसेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.

मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगला जोर धरला होता. डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं सांगितली आहे.

लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत देखील किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर जालना, हिंगोली या जिल्ह्यांत किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत पुढील 3 दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

Leave a Comment