पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळाले पाहिजे ही गेली ४० वर्षापासूनची तालुक्यातील जनतेची मागणी आहे. पण अद्याप पर्यंत कोणत्याच योजना कार्यान्वित झाल्या नाही. सर्वच राजकीय पुढार्यांनी आश्वासन देऊन फसवणूक केली असल्याच्या भावना जनतेच्या झाल्या आहेत, पण भूमिपुत्र शेतकरी संघटनेने हा विषय हातात घेत पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरली आहे. विधानसभेपूर्वी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबून पुर्ण तालुका ढवळून निघाला होता.
नुकतेच गणपती चौफुला कान्हूर पारनेर रोड या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा लढा तीव्र करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी गाव तिथे कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर रविवार दिनांक १२/१/२०२५ रोजी कान्हूर पठार या ठिकाणाहून शुभारंभ करत या अभिनयाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, संतोष वाडेकर यांनी दिली आहे.
आपल्या मुलाबाळांच्या उद्याच्या येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी, तालुक्यातील बेरोजगारी थांबवण्यासाठी, दुष्काळी पारनेर तालुका अशी असलेली ओळख पुसण्यासाठी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावातील युवकांनी, शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन गाव तिथे कृती समिती स्थापन करावी असे आवाहन पारनेर तालुका पाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
