अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं अण्णा हजारे म्हणाले. तसेच दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले.
एकीकडे अरविंद केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं, असं मतही अण्णा हजारे यांनी मांडलं. त्याचप्रमाणे राजकीय आरोप, प्रत्यारोप तर होतंच असतात, अशी प्रतिक्रिया देखील अण्णा हजारे यांनी दिली.
अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामे केली मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली, अशी टीकाही अण्णा हजारे यांनी केली. दारूचे मोठ्या प्रमाणात लायसन दिले गेले त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता त्यांना नाकारल्याचं दिसत आहे आज जो कौल आपल्याला पाहायला मिळतो आहे तो दारूच्या दुकानांना दिलेली लायसन्स आणि त्यातून मिळालेले पैसे याचा परिणाम असल्याचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
