संगमनेर(DSNews24/किरण पुरी)तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार बिबटे संचार करत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे या मोकाट बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर बिरेवाडी येथील शेतकरी नवनाथ रंगनाथ ढेंबरे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता.
दरम्यान भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. मात्र अजूनही बिबटे मोकाट फिरत असल्याने पुन्हा त्याच परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यामुळे पुन्हा एक बिबट्या आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्या बिबट्याला संगमनेर ला नेण्यात आले.
मात्र त्यानंतर काही तासांतच आणखी दोन बिबटे प्रत्यक्ष फिरताना असून आल्याने मोठी घबराट पसरली आहे. तसेच एका मकाच्या शेतात दोन बिबटे शिरल्याची माहिती समोर आली आहे. जवळपासच असलेल्या एका महिलेला बिबटे दिसल्याने त्या महिलेची अक्षरशः बोबडी वळली आहे. दोन बिबटे एकाच वेळी दिसल्याने परिसरातील नागरिक पुर्णपणे घाबरुन गेले आहे. दरम्यान या बिबट्यांना तातडीने रेस्क्यु ऑपरेशन करून वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत फोनद्वारे माहिती देण्यात आली आहे.
तसेच वनविभागाने तातडीने या मोकाट बिबट्यांना जेरबंद करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
