दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व तृणमूल काँग्रेसला अनुक्रमे नागालँड व मेघालय या राज्यांत राज्य पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या दोन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.
लोक जनशक्ती पार्टी (राम- विलास) या पक्षाला नागालँडमध्ये, व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टीला मेघालयात तर टिपरा मोथा या पक्षाला त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
आता देशात ६ राष्ट्रीय पक्ष-
भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.
