संगमनेर(DSNews24/किरण पुरी) देश पारतंत्र्यात असताना सह्याद्रीच्या खडकातून खळखळून वाहणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या साकूर पठारभागातील मुळामाईच्या काठावर वसलेल्या मांडव्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली तसेच चांदशहावली बाबांच्या प्रसिद्ध भूमितील मांडवे बुद्रुक येथे एका समाजहितैषी, समाजसेवकाचा २ जानेवारी १९३० रोजी पाटीलकी असणाऱ्या कुटुंबांमध्ये सखाराम सटवाजी धुळगंड व रखमाबाई सखाराम धुळगंड यांच्या पोटी सिताराम पा. धुळगंड यांचा जन्म झाला.
रात्रीच्या शाळेतून घेतले धडे…
मांडवे बुद्रुक येथे त्यांचे बालपण गेले. खरंतर तो काळ इंग्रजांचा म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचाच होता. त्यावेळी सर्वत्र शिक्षणाची सोयही नव्हती. त्यामुळे सिताराम पाटील धुळगंड यांनी शिक्षण घेतले नाही. मात्र त्यावेळी रात्रीची शाळा असायची तेथे जाऊन त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. त्यातच अत्यंत हुशार, चलाख बुद्धी, चतूर असे ते होते. त्यामुळे त्यांचा हा बाणाच कामी आला.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केला मेंढपाळ व शेती व्यवसाय
त्यानंतर डिग्रस येथील खेमनर पाटील घराण्यातील सरूबाई यांच्याशी सिताराम पाटील धुळगंड यांनी १९५० व्या वर्षी लग्नाची गाठ बांधली अन् संसाराला सुरुवात केली. त्यांना तीन भाऊ, सहा बहिणी तसेच तीन मुले व दोन मुली, एक पुतणे व पाच पुतण्या, सुना, नाती, नातवंडे असा मोठा परिवार त्यांचा आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी १९५० ते १९६५ पर्यंत त्यांनी मेंढपाळ व शेती व्यवसाय केला. त्यानंतर सिताराम पाटील त्यांच्या स्पष्टोक्तीपणामुळे राजकारण, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सक्रिय झाले अन् एक नवी ओळख त्यांनी निर्माण केली.
सिताराम पाटील राजकारणात सक्रिय
सिताराम पाटील राजकारणात सक्रिय झाल्याने त्यांनी गावाच्या विकासासाठी संकल्प केला होता. गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी स्व. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, स्व. हनुमंत पाटील खेमनर, शाळीराम होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली १९८५ साली गौरी सहकारी पाणी पुरवठा योजनेची स्थापना केली. त्यामुळे संपूर्ण माळरानावर अक्षरशः नंदनवन फुलवले गेले..
शिक्षणासाठी सिताराम पाटलांचा पुढाकार
तसेच गावातील मुले गावातच शिकली पाहिजे असा ध्यास सिताराम पाटील यांनी धरला होता. त्यासाठी त्यांनी मांडवे गावात १९९३ साली सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, स्व. अशोक पाटील खेमनर, शंकरराव पाटील खेमनर यांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. आजही ते विद्यालय शिक्षण सेवेत आहे.
५५ वर्ष राजकारणात किंग मेकरची बजावली भूमिका
त्याचबरोबर गावातील राजकारणात तर ते कायमच किंगमेकर म्हणूनच राहिले. विशेषतः कुठलीही पदाची लालसा त्यांनी केली नाही. सिताराम पाटलांचा गावात अक्षरशः राजकीय दबदबा होता.. तब्बल ५५ वर्ष राजकारणात किंग मेकर ची भूमिका त्यांनी बजावली….
लेकी बाळांच्या अडीअडचणींसाठी धावले सिताराम पाटील
सिताराम पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लेकी बाळांच्या अडीअडचणींना धावून जात संसार फुलवले म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली होती. तसेच वाद कोणताही असो तो मिटविण्याच काम त्यांनी केल. विशेषतः कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उच्चशिक्षित बनवले. तसेच व्यावसाय टाकून दिले आज जो तो आपला उदरनिर्वाह भागवत आहे असा अचूकपणे गाडा कुटुंबांचा त्यांनी बसवला… म्हणजेच प्रपंचाबरोबर त्यांनी गावगाडा देखील सांभाळला
धार्मिक कार्यातही सिताराम पाटलांचा मोठा पुढाकार
गावात सहकार्यांच्या मदतीनं खंडीत झालेला सप्ताह १९८८ साली चालू त्यांनी केला. माणिकगिरी महाराजांच्या पायी दिंडीचे २००८ पासून उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा केली. तसेच २०१० साली माणिकगिरी महाराजांच्या फिरत्या नारळी सप्ताहाचे सिताराम पाटील यांनी गावकरी, तरूणांच्या सहकार्याने आयोजन केले होते. तसेच सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे ते जवळपास २० वर्षे संचालक होते.
रूबाबात जगल आयुष्य
विशेषतः त्यांनी चारीधाम, काशी, महाराष्ट्र दर्शन, दक्षिण व उत्तर देवस्थानांना भेटी दिल्या. आयुष्यात त्यांनी रूबाबात आपलं आयुष्य जगले. कधीच झुकले नाहीत. मात्र शेवटी २०१९ साली त्यांनी गावातील सर्व क्षेत्रातून कार्यमुक्त होण्याचे ठरवले.
समाजाला न्याय देणारा न्यायाधीशाचा सोनेरी अध्याय संपला
स्वच्छ पांढरे धोतर, तीन बटणाचा शर्ट, शोभेल असा रुबाबदार पेहराव व डोक्यावर केसरी रंगाचा फेटा असणारे कुस्तीपटू सिताराम पा. धुळगंड हे अगदी शेवटपर्यंत त्याच रुबाबात चालत फिरत राहिले. परंतु २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज सर्वांना जणू पोरके झाल्यासारखे वाटत आहे. आज ते गेल्याने मांडवे बुद्रुक येथील वैभवशाली परंपरेतील एक समाजाला न्याय देणारा न्यायाधीशाचा सोनेरी अध्याय संपला असे म्हणायला हरकत नाही! अशा या व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली…..
शब्द संकलन – प्रा. सोपान धुळगंड सर (मो. 96896 24747)
शब्दांकन – मुख्य संपादक किरण पुरी (मो. 9307810634)
