बापरे! महाराष्ट्रावर कोरोनाचे पुन्हा संकट, एवढी रूग्णसंख्या वाढली

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात काल शुक्रवारी 23 मे रोजी नवीन 45 कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात ४ रुग्ण आढळले. खळबळजनक म्हणजे या महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण १७७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्यावर मास्क लावायची वेळ येतेय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणत्या शहरात किती रुग्ण? 

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई ३५, पुण्यात ४, रायगड २, कोल्हापूरात २, ठाण्यात १ आणि लातूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. आत्तापर्यंतची आकडेवारी बघितली तर राज्यात १ जानेवारी ते २३ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार ८१९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २१० रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील ८१ करोना रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याने टेन्शन वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सुद्धा महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सध्याचे रुग्ण प्रामुख्याने ओमिक्रॉन JN.1 आणि कोरोनाच्या उप-व्हेरिएंट्समुळे (उदा., LF.7, NB.1.8) आहेत, जे अत्यंत संसर्गजन्य मानले जातात, परंतु कमी घातक आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घश्यात खवखव होणे आणि शारीरिक दुखणे अशी लक्षणे दिसतात.

कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये –

खरं तर कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये संपूर्ण जगभर हा विषाणू पसरला. भारतात तर करोडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांनी यातून स्वतःचा बचाव केला तर काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉक डाउन करण्यात आलं, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती. 2022 पासून जग हळूहळू पूर्वपदावर आले. परंतु आता हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे ही पुन्हा लाट येणार का अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या या नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Comment