पठारभाग हादरला! पंचवीस वर्षीय विवाहित महिलेची हत्या

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील पठार भागातील कर्जुले पठार येथे एका 25 वर्षीय मयत रुपाली ज्ञानदेव वाघ या विवाहित महिलेची हत्या करण्यात आली. शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादात कर्जुले पठार येथे रुपाली वाघ या महिलेची चाकू भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे पठार भागात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी कि, कर्जुले पठार येथील रहिवाशी असलेले अजित दादाभाऊ वाघ वय 25. यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कि, त्यांच्या घरा जवळ मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटूंब राहते. वाघ कुटूंबाला शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी जात असे. मंगळवारी रात्री 10 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अजित वाघ यांची वहिनी रुपाली वाघ शौचालयासाठी पडवळ यांच्या शेतात गेल्या होत्या त्यावेळी विक्रम पडवळ हा तिथे आला आणि त्याने रुपाली हिस म्हणाला कि तुम्ही आमच्या शेतात शौचालयासाठी का येता? असे म्हणत शिवीगाळ केली.रात्री आठ वाजेच्या सुमारास अजित वाघ त्यांचे भाऊ ज्ञान देव वाघ, वहिनी रुपाली वाघ आणि बहीण मोनिका दादाभाऊ वाघ हे विक्रम पडवळ यांच्या घरी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यावेळी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ आणि अलका पडवळ यांनी त्यांना शिवीगाळ केली.

वाघ कुटूंबीयांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली असता मुरलीधर पडवळ यांनी वाघ कुटूबीयांना जातीवाचक शिवीगाळ केली.संतापलेल्या विक्रम पडवळयाने वाघ कुटूंबातील सदस्यांना दम भरत आता तुम्हाला जिवंत नाही सोडणार असे म्हणत घरातून धारदार चाकू घेऊन आला असता अलका पडवळ हिने रूपाळी वाघ हिचे हात धरले आणि विक्रम पडवळ याने रुपालीच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसला. रुपाली हिला वाचवण्यासाठी तिची नणंद मोनिका वाघ धावली असता पिसाळलेल्या विक्रम ने मोनिकाच्या कमरेला चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. मोनिका वाघ ही महिला गंभीर जखमी असून लोणी येथे उपचार सुरु आहे.

सदरील घटना झाल्यावर तात्काळ वाघ यांनी रुपाली आणि मोनिका यांना मोटार सायकल वरून साकूर फाटा येथे नेले आणि तेथून खासगी रुग्णवाहीकेतून त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक डॉक्टर यांनी त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठवले असता उपचारादरम्यान बुधवारी अकरा जून च्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुपाली ज्ञान देव वाघ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले असून मोनिका वाघ यांच्यावर उपचार सुरु आहे.

या प्रकरणी अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ आणि अलका विक्रम पडवळ सर्व रा. कर्जुले पठार. ता. संगमनेर. जि. अ. नगर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.

मात्र या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलिस नाईक दत्तू चौधरी, पो. कॉ. प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, महादेव हांडे यांचं पथक आरोपीला जेरबंद करण्यासाठी रवाना करण्यात आले होते. अवघ्या काही तासांतच पोलासांनी आरोपी विक्रम मुरलीधर पडवळ, अलका पडवळ, आणि मुरलीधर पडवळ यांना अटक करण्यास यश आल आहे.

Leave a Comment