विहीरीच्या काठावर ओढणी दिसली, पोलिसांनी ४५ फुट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला अन् 

पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरातील चोविसावाडीत गुरुवारी (26 जून) सकाळच्या सुमारास एका विहिरीत 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखल होत शोधमोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासानुसार आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं घडलं काय?

वैष्णवी संतोष इंगवले असं मृत तरुणीचं नाव असून, ती 25 जूनपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस तपास करत असतानाच तिच्या ठिकाणाजवळील एका विहिरीच्या काठावर ओढणी आढळून आली. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. विहिरीत अंदाजे 45 फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा टाकून शोध सुरू करण्यात आला. काही वेळातच त्या कॅमेऱ्यात वैष्णवीचा मृतदेह दिसून आला.

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैष्णवीने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिच्या घरच्यांकडूनही कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेने चोविसावाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Comment