राज्यात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला आहे, हिंदी सक्ती आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
पाच जुलै रोजी मुंबई भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघेही उपस्थिती राहणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शुक्रवारीच या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या मोर्चाला पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
पाच जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नाही. हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भात काही भावना व्यक्त करायच्या असतील तर आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे
