साकूर पठार भागातील रस्त्यांची दुरवस्था, उपसरपंच बसणार उपोषणाला 

संगमनेर – तालुक्यातील साकुर पठार भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते दुरुस्ती करण्यात यावे तसेच उर्वरित राहिलेल्या रस्त्यांचे काम पुर्ण करावी जर सदर कामांबाबत कारवाई झाली नाही तर जांबूत , बिरेवाडी, शेंडेवाडी, तासकरवाडी साकुर पठारभागातील ग्रामस्थांसह ०१ जुलैपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहिल्यानगर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन अहिल्या नगर येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयास जांबुत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्द ते पारनेर हद्द रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पूर्ण करण्यात आलेला असून सदर रस्त्याचे काम ४ वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे. (अपवाद : जांबूत खुर्द अंतर्गत १ किमी मीटर रस्त्याचे काम झाले नाही) मात्र या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच रस्त्यांवर खड्डे पडलेले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्त्यांना संरक्षण गार्ड निम्या घाटात संरक्षण गार्ड बसवली, परंतु ती निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. साईट गटार पावसाळ्याच्या पाण्याने ना दुरुस्त झाले आहे.

साईट गटारामध्ये मोठ्या प्रमाणात माती पडल्याने गटार पूर्ण बुजले आहे. घाटामध्ये दरड कोसळल्या आहेत व त्यामुळे प्रवाशांना धोका होऊ शकतो. रस्ता खराब असल्याने मोटार सायकल चालकांना व इतर चालकांना जीव मुठीत धरून जावे लागते व त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास हानी होऊ शकते. यापूर्वी याबाबत पत्रव्यवहार केला असता तीन महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच रस्त्यांचे साईट गटार बुजल्याने शेतकऱ्यांचे शेतात पाणी जात आहे.

पारनेर व संगमनेर तालुक्याची या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून जातात. सदर रस्ता झाल्यापासून पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करावी लागते परंतु अजुन दुरुस्ती झाली नाही तसे प्रशासनास वारंवार कळविले आहे. परंतु देखभाल दुरुस्ती होत नाही. साकुर ते तासकरवाडी रस्ता, डोळासने ते शेंडेवाडी हे रस्ते ग्रामसडक योजनेतून झालेले आहेत परंतु याही रस्त्याची देखभाल-दुरुस्ती झालेली नाही. साकुर ते बिरेवाडी रस्ता चे कामाचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेले आहे. परंतु त्याचे काम चालू झाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलिस अधिक्षक अहिल्यानगर, उपविभागीय अधिकारी संगमनेर, तहसीलदार संगमनेर यांना दिल्या आहेत.

Leave a Comment