पारनेर ( DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील खडकवाडी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भर दिवसा बिबट्याने डरकाळी फोडल्याने एकच खळबळ उडाली होती. एक ते दोन बिबटे डोंगर परिसरातील शेतात लपून बसल्याची माहिती समोर आली होती. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
मात्र बिबट्याने आता मुरूडे डोंगर पायथ्याजवळ नवले वस्तीवर अर्जुन शंकर नवले या शेतकऱ्याच्या जर्सी गाईवर थेट बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खडकवाडी परिसरात भरदिवसा बिबटे मुक्त संचार करत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला शेतकऱ्यांनी मागणी केली होती. मात्र वनविभागाकडून अक्षरशः दुर्लक्ष केले गेले. त्यातच बिबट्याने आता थेट गाईवर हल्ला करत ठार केल्याने आता तरी वनविभागाला जाग येईल का? हा प्रश्न शेतकरी विचारत आहे. तसेच आता नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. त्यामुळे तातडीने या मोकाट बिबट्यांना जेरबंद करा अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे यांनी DSNews24 शी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.
