राज्यातील “या” शिक्षकांसाठी आनंदाची बातमी 

मुंबई : राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांची टप्पा अनुदानाची मागणी होती त्यासाठी आंदोलनही केले होते. काल मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये टप्पा अनुदानासाठी निधी देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली होती.

अखेर या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. याचा फायदा राज्यातील 52 हजार 276 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या या शासन निर्णयानुसार, सध्या 20 टक्के, 40 टक्के व 60 टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांना पुढील 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, पात्र ठरलेल्या 231 शाळांना नव्याने 20 टक्के अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सरकारच्या तिजोरीवर अंदाजे 970 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना येत्या ऑगस्ट महिन्यापासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीला नुकतीच मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली होती. विधानसभेच्या अधिवेशनात यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन केले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष अनुदान टप्पा मंजूर करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील 50 हजारांपेक्षा अधिक शालेय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने टप्पा अनुदानाला मंजुरी दिली असल्याने शालेय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यामुळे 52 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. अनेक दिवसांपासून शिक्षक संघटना याची मागणी करत होत्या, तसेच, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Leave a Comment