पुणे – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला वेग आला आहे. तब्बल पंधरा दिवसांनी मॉन्सूनचा थांबलेला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्राचा निरोप घेण्याची शक्यता आहे.
यंदा १४ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेपेक्षा (१७ सप्टेंबर) तीन दिवस आधीच राजस्थानमधून मुक्काम हलवला. त्यानंतर मजल-दरमजल करत परतीचा प्रवास सुरू असताना, २६ सप्टेंबरपासून मॉन्सूनचा प्रवास थांबला. तब्बल दोन आठवड्यांनी परतीच्या मॉन्सूनने पुढील वाटचाल सुरू केली.
शनिवारी (ता. १०) संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्राचा उत्तर भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारच्या काही भागांतून मोसमी वारे परतले आहेत. मॉन्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
यंदा राज्यात विक्रमी वेगाने दाखल झाल्यानंतर १७ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. तीन महिने २३ दिवसांनी मॉन्सूनने महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. परतीच्या प्रवासाला वेग येणार असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागातून काढता पाय घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा विक्रमी वेगाने आगमन करत २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल मॉन्सून झाला. मॉन्सूनने २५ मे रोजी तळ कोकणात दाखल होत महाराष्ट्रात धडक दिली. त्यानंतर वाटचाल अडखळल्याने १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला. पुढील प्रवास वेगाने करत अवघ्या १२ दिवसांत मॉन्सूनने देशात सर्वदूर मजल मारली. २९ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.
