मुंबई : शुक्रवारी (ता. 17 ऑक्टोबर) बीडमध्ये राज्यातील ओबीसी नेत्यांची एल्गार सभा झाली. या सभेमधून मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे व अन्य नेते उपस्थित होते.
पण यावेळी केलेल्या भाषणातून भुजबळांनी सरकारमधील मंत्री आणि त्यांचेच सहकारी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी विखे पाटलांवर टीका करत “विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला, जीआर काढला.” असे म्हणत त्यांच्यावर एकेरी शब्दांत टीका केली. ज्यानंतर आता त्यांच्या या टीकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजून सांगणार आहे, असे विखे पाटलांनी म्हटले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. कायद्याचा चौकटीत बसवून मराठ्यवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे. मी भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजून सांगणार आहे. सोबत न्यायमूर्ती शिंदे यांना घेऊन जाणार आहे. ते त्यांना सगळं समजून सांगतील आणि त्यांचा गैरसमज दूर केला जाईल. तसेच, माझी भूमिका स्पष्ट करायची आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विषय केला आहे. भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी-मराठा वातावरण मला कधी वाटलं नाही. आता 5 कोर्टात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात. सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता दिवाळी साजरी करत आहोत. ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असे कधी झाले आहे का? असेही यावेळी विखे पाटलांनी म्हटले.
तर, जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आंदोलन चालवले. त्यांनी निस्वार्थीपणे आंदोलन केले. आम्ही जे काही केले आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून तो विषय मार्गी लावला आहे. तुम्ही त्यांचे शिक्षण काढत आहात हे चुकीचे आहे. या पुढाऱ्यांना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलावणार आणि न्यायमूर्ती शिंदे यांना बोलवून त्यांना विषय समजून सांगणार आहोत, असे देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता दिवाळीनंतर भुजबळ विखे पाटलांची भेट घेतात की नाही? आणि यावर नेमका काय मार्ग निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
