आ. रोहित पवारांच्या “त्या” आरोपावर बाळासाहेब थोरातांचा जोरदार पलटवार, म्हणाले 

जामखेड नगरपालिकेतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या आरोपावर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पलटवार केला आहे.

रोहित पवार स्वत:च काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद करत नसल्याने त्यांना हे अपयश आल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीतील पराभवावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्येच आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जामखेड पालिका निवडणुकनिमित्ताने भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व राष्ट्रवादीचे रोहित पवार या दोघांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई रंगली होती. यापूर्वी जामखेड पालिकेत रोहित पवार यांचे वर्चस्व होते, ते आता राम शिंदे यांच्याकडून हिरावले गेले आहे. रोहित पवार यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे.

या पराभवानंतर रोहित पवार यांनी आघाडीमधील काँग्रेस पक्षावरच सोमवारी जोरदार टीकास्त्र सोडत काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला आहे. पवार म्हणाले, की जामखेड पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले. यापुढे अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न पडतो. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपण बोलणार आहोत.

रोहित पवार म्हणाले, की कर्जत -जामखेडमधील जनतेने दोनदा मतांचे दान भरभरून टाकले. त्यांच्या मी कायम ऋणात राहील, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, उमेदवारांनीही पूर्ण ताकतीने निवडणूक लढवली तरीही आज लागलेला निकाल हा अत्यंत निराशाजनक व काम करणाऱ्याला नाउमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसा चालत असेल तर राजकीय दृष्टिकोनातून दुर्लक्षित व सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेचा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांना न्याय कधी मिळणार?

आज तत्व आणि विकासावर चालणारे स्वच्छ राजकारण कमी व पैशांनी गढूळ झालेलं अधिक दिसत आहे. म्हणूनच जामखेड पालिकेच्या निवडणुकीत आमच्या विरोधात आलेल्या निवडून आलेल्या काही लोकांचे कारणामे व धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्याचे नाव घेण्याची लाज वाटते. महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसेच धर्मनिरपेक्ष व समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळे यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान रोहीत पवारांच्या या आरोपाने सर्वत्र खळबळ उडाली. यावर लोगलग काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पलटवार केला आहे. रोहित पवार यांच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता, थोरात यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की गेल्या विधानसभा निवडणूक रोहित पवार यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली. ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद करत नाहीत. त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतात. त्यामुळे आपण त्यांना याची पूर्वीच कल्पना देत काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधा, चर्चा करा, असे सांगितले होते, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला असे सांगत थोरात यांनीही काँग्रेसच्या नगर जिल्ह्यातील भूमिकेचे समर्थनच केले आहे.

Leave a Comment