पुणे : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सध्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरू झाली आहेत. काही ठिकाणी युती आणि आघाडी झाल्या आहेत, मात्र अद्यापही जागावाटप किंवा तिकीट वाटप झालेले नाही.
असे असतानाच पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अर्ज भरण्यासाठी आलेल्या बंडू आंदेकरची पोलीस व्हॅनमधून सिनेस्टाईल एन्ट्री झाली. यानंतर घोषणाबाजी करत बंडू आंदेकर याने उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी सुरवातीला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर गुंड बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणण्यात आले, त्यावेळी पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी बंडू आंदेकरच्या हाताला बेड्या न ठोकता, त्याला दोरखंडाने बांधले होते. तसेच त्याच्या तोंडावर काळा स्कार्फ घातला होता. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील परिसरात आल्यानंतर बंडू आंदेकरने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
बंडू आंदेकरने घोषणा दिल्या की, ‘नेकी का काम आंदेकर का नाम’, ‘बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय’, ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत.’ अशी घोषणाबाजी केल्यानंतर बंडू आंदेकरने माध्यमांसमोरून जात असताना ‘मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही’ असे म्हटले. तसेच लोकशाही मार्गानेच जनतेच्या पाठबळावर आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा बंडू आंदेकरने केला. यावेळी त्याने वनराज आंदेकर जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता बंडू आंदेकर सुद्धा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यालाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, बंडू आंदेकरने उमेदवारी अर्ज भरल्याचे समजल्यावर मृत आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राजकीय पक्षांना विनंती करताना म्हटले की, जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान आमच्यावर अन्याय तरी करू नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. सत्ता होती म्हणून बंडू आंदेकरने आजवर सर्व काही केलं. त्यामुळे कृपया त्याला निवडणुकीचे तिकीट देऊ नका. तसेच जो पक्ष आंदेकरांना तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेन. मला माझ्या गोविंदला न्याय द्यायचा आहे. एवढीच माझी इच्छा आहे, अशी भावनिक साद घालण्याचा संजीवनी कोमकर यांनी प्रयत्न केला आहे.
