बिरेवाडी येथून पायी दिंडी होणार शिर्डीकडे मार्गस्थ ; २ जानेवारीला साई संगित भजन

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईराम गृपच्या वतीने २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर असे श्री क्षेत्र बिरेवाडी ते श्री क्षेत्र शिर्डी असे साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिंडीच्या सांगतेला २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत मुंबई येथील साई संगित भजनाचा खास कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती साईराम गृपचे अध्यक्ष नानासाहेब भोसले यांनी दिली आहे.

२० वर्षांपासून अखंडित परंपरा

गेल्या २० वर्षांपासून साईराम गृपच्या वतीने या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. पायी दिंडीचे यंदाचे हे एकविसावे वर्ष आहे. तसेच दिंडीच्या प्रस्थानाआधी साईराम गृपच्या पदाधिकाऱ्यांनी या दिंडीची जय्यत तयारी सुरू केली आहे. साईबाबांचा खास रथ या दिंडीत असणार आहे. जवळपास २० वर्षांपासून या दिंडीने ही परंपरा जपली आहे.

दिंडीचा तीन ठिकाणी मुक्काम

पायी दिंडीचे प्रस्थान वार – सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बिरेवाडी गावठाण येथील हनुमान मंदीरापासून होणार आहे. प्रस्थानवेळी साईबाबांची आरती देखील होणार असून त्यानंतर साईबाबांच्या जयघोषात शिर्डीकडे ही दिंडी मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर या दिंडीचा पहिला मुक्काम पानोडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात होणार आहे. तसेच दिंडीचा दुसरा मुक्काम वार – मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी लोणी येथील श्री लोमेश्वर मंदिर या ठिकाणी होणार आहे. तसेच तिसरा मुक्काम थेट शिर्डीत ३१ डिसेंबर रोजी होणार असून या दिवशी नववर्षाच्या निमित्ताने दिंडीतील सर्व साईभक्त साईबाबांच दर्शन घेणार आहे.

साई भक्तांसाठी २ जानेवारीला साई संगित भजन

त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी ही दिंडी प्रगतीचा प्रवास करणार आहे. दिंडीच्या सांगतेला साईराम गृपने बिरेवाडीत २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत मुंबई येथील साई संगित भजनाचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे साईभक्तांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना साई संगिताच्या भजनाचा आनंद लुटता येणार आहे.

पदाधिकाऱ्यांचे साईभक्तांना आवाहन 

दरम्यान दिंडीतील साईभक्तांसाठी ठिकठिकाणी अन्नदाते अन्नदान करणार आहे. तसेच दिंडीत रथापासून ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत सौजन्य म्हणून काही साईभक्तांनी हातभार लावला आहे. या पायी दिंडीत शेकडो तरूण तन मन धनाने सहभागी होत असतात. साईराम गृपने साईभक्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे या दिंडीत सहभागी होण्यासाठी साईराम गृपच्या वतीने आवाहन केले आहे.

Leave a Comment