वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, गॅस सिलिंडर महागला

नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला महागाईचा फटका बसला आहे. देशात महागाईचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाली असताना आता नवीन वर्ष 2026 च्या पहिल्याच दिवसापासून एलपीजी सिलेंडरच्या भावात थेट वाढ करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महागाईचा धक्का बसला असून तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित अनेक प्रमुख किमतींमध्ये आज बदल करण्यात आले.

एलपीजी सिलिंडरचा भाव वाढला

1 जानेवारी 2026 पासून तेल विपणन कंपन्या म्हणजे OMCs नी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत, तर विमान टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमतीही कमी केल्या आहेत. या बदलांचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विमान वाहतूक क्षेत्र आणि सामान्य ग्राहकांवर होईल. देशातील सरकारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या (तेल सार्वजनिक उपक्रम) दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला

1 जानेवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अंदाजे 111 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या तेल विपणन कंपन्यांनी ही वाढ लागू केली असून याचा विशेषतः हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या लहान व्यवसायांवर परिणाम होईल.

याआधी डिसेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडर अवघ्या नाममात्र एक रुपयाने स्वस्त झाला होता. याउलट, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने पीएनजीची किंमत कमी केली. त्याचवेळी, पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरचा भाव ‘जैसे थे’ ठेवला असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

मुंबईसह मेट्रो शहरात एलपीजी सिलिंडरचा दर काय

अशाप्रकारे 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेल्या नवीन दरांनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती महानगरांमध्ये बदलल्या आहेत. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,642.50 रुपये झाली आहे तर दिल्लीत 1,691.50 रुपये, कोलकातामध्ये वाढून 1,795 रुपये झाली आहे.

Leave a Comment