भल्या सकाळी शेतकरी गोठ्यात गेला आणि समोर बघताच… पठार भागातील घटना

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील पठार भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पठार भागातील घारगांव परिसरातील शिदायकवाडी येथे बिबट्याने गोठ्यात घूसून गायीवर हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आहे.

शिदायकवाडी येथील कल्पेश कमलाकर आहेर हे दुग्ध व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. त्यांच्याकडे जवळपास पन्नास गाई आहेत. शुक्रवारी रात्री बिबट्याने त्यांच्या गोठ्यात एंट्री केली. यावेळी बिबट्याने थेट गाईवर हल्ला करत जागीच ठार केले. त्यानंतर बिबट्याने गाईला गोठयाबाहेर ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गाय तो घेऊन जाऊ शकला नाही, शेवटी त्याने तेथेच बसून ताव मारला. दरम्यान नेहमीप्रमाणे कल्पेश आहेर हे सकाळी गोठ्यात गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच वनरक्षक श्रीकिसन सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Leave a Comment