संगमनेर(DSNews24/किरण पुरी) हरिश्चंद्र येथून उगम पावणाऱ्या मुळा नदी किनारी वसलेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामदैवत असलेल्या बनाची देवीची यात्रा परंपरेनुसार गेली अनेक वर्षांपासून उत्साहात साजरी होत असते. यंदाही बनाच्या देवीची यात्रा ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी होणार असून या यात्रेची जय्यत तयारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल नानापाटील खेमनर यांनी दिलीय.
यंदा बनाच्या देवीच्या यात्रेचा शनिवार दि. ४ एप्रिल रोजी शुभारंभ होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता बनाई देवीचे चोळी पातळ व मुखवटा मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता साकूर ते बन अशी भव्य काठी मिरवणूक निघणार आहे. तसेच रात्री यात्रेकरूंनासाठी चंद्रकांत ढवळपुरीकर सिनेस्टार यांचे चिरंजीव किरणकुमार ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. यावेळी बनाई देवीच्या मंदिरासमोर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
तसेच वार – रविवार दि. ५ एप्रिल रोजी मुख्य यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. या दिवशी दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांच्या हंगामाचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे. या हंगामात विविध जिल्ह्यांतील नामांकित मल्ल आखाड्यात उतरणार आहे.
दरम्यान यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेकरूंसाठी यात्रेच्या दिवशी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच यात्रेच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात असणार आहे.
तसेच बनाची देवीच्या यात्रा उत्सावात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच सचिन सोनवणे, यात्रा कमिटीचे सचिव भास्कर घनशाम खेमनर, उपाध्यक्ष मन्सूर पटेल व निसार पटेल, सदस्य अकबर चौगुले, नामदेव खेमनर, विठोबा खेमनर, शशिकांत केदारी, तुळशीराम खेमनर यांनी केले आहे.
