तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय पक्षाकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. टीव्हीके पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांनी नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात लाभार्थी योजनांमध्ये महिला, तरूण आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, धानासाठी ३ हजार ५०० रुपयांचा हमीभाव, १०,००० रुपयांचे वार्षिक अनुदान आणि ५ लाख मोफत सौर पंप, ६० वर्षाखालील महिलांसाठी दरमहा २ हजार ५०० रुपये आर्थिक मदत, तरुण मुलींना लग्नासाठी ८ ग्रॅम सोने आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर या आश्वासनांचा समावेश आहे.
संपूर्ण कर्जमाफी
अभिनेते विजय यांनी महिला ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिले आहे. यामध्ये कृषी सहकारी संस्थांकडून घेतलेली सर्व पीक कर्जे पूर्णत माफ केली जातील, असे जाहीरनाम्यात सांगितले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या शेतकऱ्यांनी कृषी सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जापैकी ५० टक्के कर्ज माफ करण्यात येईल, असेही जाहीर केले आहे.
धानाला ३ हजार ५०० रुपये हमीभाव
तमिळनाडूमध्ये भात पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे भात खरेदीसाठी आत्ताच्या २ हजार ५०० रुपये क्विंटलच्या हमीभावात वाढ करून प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये करण्याची घोषणा केली आहे. तर उसाला ४ हजार ५०० रुपये प्रति टनाचा दर, १०० टक्के पीकविमा संरक्षण, ५ लाख मोफत सौर पंप आणि शेतकमजूरांना दरवर्षी १० हजार रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन विजय यांनी जाहीरनाम्यात दिले आहे.
शिक्षणावर भर
विजय यांनी शिक्षणासाठी विविध घोषणा केल्या आहेत. शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी आणि राज्य-अनुदानित शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक १५ हजार रुपये देऊ, असे जाहीरनाम्यात वचन दिले आहे. तर उच्च शिक्षणासाठी २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे आश्वासनही देण्यात आले आहे. एआय विद्यापीठ आणि एआय शहर स्थापन करण्याचे आकर्षक आश्वासन दिले आहे.
दरम्यान, पहिल्या निवडणुकीत सत्तेवर आलो तर भ्रष्टाचारमुक्त सुशासन निर्माण करण्याचे आश्वासन प्रचारसभेत दिले आहे. तर महिला बचत गटांना ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देऊ असेही सांगितले आहे.
