महाराष्ट्र सुन्न! विहिरीला पाणी लागलं, बापाने दोन्ही लेकांना बोलवल पण क्षणात तिघेही….

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. आपल्या शेतात विहिरीचे काम करत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने वडिलांसह त्यांच्या दोन तरुण मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तसेच यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

धानोरा येथील शेतकरी बाजीराव सर्जेराव काकडे (४९) यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून नवीन विहिरीचे काम सुरू होते. या विहिरीचे खोदकाम सुमारे ५० फुटांपर्यंत पूर्ण झाले होते. सुदैवाने विहिरीला चांगले पाणीही लागले होते. विहिरीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. विहिरीवरील कठड्याचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली.

सोमवारी विहिरीत साचलेले पाणी काढण्यासाठी बाजीराव काकडे आणि त्यांची दोन मुले आजिनाथ काकडे (२६) व शाम काकडे (२२) हे विहिरीत उतरले होते. हे तिघेही कामात व्यस्त असताना अचानक विहिरीचा वरचा कठडा आणि बाजूची माती मोठ्या प्रमाणावर खाली आली. काही समजण्यापूर्वीच मातीचा प्रचंड ढिगारा या तिघांवर कोसळला. यानंतर ते तिघेही ५० फूट खोल विहिरीत ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यामुळे गुदमरून तिघांचाही जागीच अंत झाला.

गावावर दुःखाचा डोंगर

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. सुरुवातीला या विहिरीतील माती उपसून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र ढिगारा मोठा असल्याने ग्रामस्थांना यश मिळाले. यानंतर पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. दुर्दैवाने या घटनेत बाजीराव काकडे यांच्यासह त्यांच्या दोन्ही तरुण मुलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा असा भीषण अंत झाल्याने काकडे कुटुंबावर आभाळ फाटले आहे. धानोरा परिसरात या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.

Leave a Comment