अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन बहिण भावांसह चौघांवर काळानं झडप घातली आहे. तलावामध्ये बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावतीच्या धातखेडा तलावात घडली आहे.
सोनाली नरेंद्र जोशी वय अंदाजे 16, आदित्य नरेंद्र जोशी वय अंदाजे 12, पायल बबलू पंडीत वय अंदाजे 21, यश गजानन काकणे वय अंदाजे 13 अशी बुडून मृत्यू पावलेल्याची नावे आहेत. बुडून मृत्यू झालेले सर्वजण अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चौघेही रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या धातखेडा बंधाऱ्यात चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन युवक आणि दोन युवती यांचा समावेश असल्याची माहिती मिळत असून, हे सर्व जण खोलापुरी गेट पोलीस ठाणे परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाची डीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे. दरम्यान एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
