राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यव्यापी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली.
या मोहिमेत १०३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान १०२ आरोपींना अटक करत ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशानाच्या एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत राज्यभरातील अनेक ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले.
एफडीएने भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि ५९ अंतर्गत गुन्हे नोंदवून १०२ आरोपींना अटक केली. या कारवाईत ३४ लाख ०५ हजार ०४८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला साठा जप्त करण्यात आला.
कोकण विभागात सर्वाधिक कारवाई
गुटखा-पानमसाला विरोधातील कारवाईत कोकण विभाग आघाडीवर राहिला. या विभागात ४७ आस्थापनांवर छापे टाकून ४६ जणांना अटक करण्यात आली. मुंबई विभागात २२ कारवाया केल्या. या प्रकरणात २३ आरोपींना अटक करण्यात आली.
भेसळयुक्त अन्नपदार्थांवरही मोठी कारवाई
गुटखा-पानमसाल्यावरील कारवाईसोबतच एफडीएने “Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra” मोहिमेअंतर्गत राज्यभरातील भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाच्या आणि अस्वच्छ परिस्थितीत तयार होणाऱ्या अन्नपदार्थांवरही धडक कारवाई केली.
मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, जळगाव, रायगड आणि धुळे जिल्ह्यांमध्ये ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईत आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की यांसह विविध अन्नपदार्थांचा १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपयांचा आणि ९०,६३९ किलो साठा जप्त करण्यात आला. संशयित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, ‘नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची विक्री किंवा उत्पादन आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल’. एफडीएच्या या राज्यव्यापी मोहिमेमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यवसायाला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
