पारनेर(DSNews24/किरण पुरी) शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे चर्चा करून भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रेनबो फार्म हाऊस, कान्हूर पठार, ता. पारनेर येथे होणार असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली.
या बैठकीत शेतीसमोरील आव्हाने व पुढील दिशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सध्याच्या काळात शेतीपुढे उभ्या राहिलेल्या विविध समस्या, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारपेठेतील चढ-उतार, नैसर्गिक संकटे, शेतमालाला मिळणारा भाव तसेच आधुनिक शेतीच्या संधी आणि शाश्वत शेतीविषयी चर्चा होणार आहे.
याशिवाय ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांनी कोणते व्यवसाय करावेत, स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि शेतीपूरक उद्योगातून आर्थिक प्रगती कशी साधता येईल, याबाबतही विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
या बैठकीस सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी तात्याराम हिरवे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, ते शेती, कृषी व्यवसाय, मूल्यवर्धन, बाजारपेठ, तसेच ग्रामीण उद्योजकतेच्या संधींबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी, युवक, कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिक तसेच स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या तरुणांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, शेतीला सक्षम दिशा देणे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे
