संगमनेर (DSNews24/किरण पुरी) पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर येथून शेळ्या चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा साकूरजवळील बिरेवाडी शिवारातील शिवडी वस्तीवर शेळी चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे शेळीपालक व शेतकरी हैराण झाले असून शेळी चोरांच्या टोळीचा सुळसुळाट झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
भास्कर रखमा ढेंबरे यांच्या मालकीच्या अंदाजे पाच शेळ्या आणि एक बोकड अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले. रविवारी रात्री घराशेजारील गोठ्यात शेळ्या बंदिस्त करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा लोखंडी दरवाजा तोडून फक्त मोठ्या शेळ्या आणि बोकड उचलून नेले.
या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, घरातील कोणीही बाहेर येऊ नये यासाठी चोरट्यांनी पडवीतील एका खांबाला दोरी बांधून घराच्या मुख्य दरवाज्याच्या कडी-कोंड्याला बाहेरून बांधून ठेवले. त्यामुळे चोरीचा प्रकार उशिरा लक्षात आला.
प्राथमिक माहितीनुसार, चोरटे चारचाकी वाहनातून आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साकूर परिसरात अल्पावधीतच दुसऱ्यांदा शेळी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घारगाव पोलिसांनी तातडीने या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
