मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा (Dharmendra Pradhan Resignation) द्यावा लागला आहे.
नवी दिल्लीत घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनाही प्रचंड वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. या घडामोडींवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. फडणवीस हे उच्चशिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्रामध्ये नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, आता त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांना स्वतःला राजीनामा द्यावा लागेल अशी भीती होती, त्यामुळे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, असा दावा संजय राऊतांनी केला.
