मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. गेल्या काही तासांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबईसह विविध जिल्ह्यांत संततधार सुरू आहे.
असे असताना भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये मुसळाधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की, उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, सोमवारी (27 जुलै) राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
