मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज्यातील ४८ पैकी २२ जागांवर दावा सांगितला आहे. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही, असे शिंदे गटाच्या खासदारांचे म्हणणे आहे.
२०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २५ जागा लढवल्या. यापैकी २३ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील, असा दावाही खासदार कीर्तिकर यांनी केला आहे.
तर गटाचे दुसरे खासदार राहुल शेवाळे यांनीही तसे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतरच शिंदे गटाला २२ जागा हव्या आहेत, हा मुद्दा समोर आला.
भाजपकडून शिंदे गटाच्या १३ खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप खा. कीर्तिकर यांनी केला. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामे झाली पाहिजेत. पण भाजपकडून खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असा आरोप कीर्तिकर यांनी केला आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचेही ते म्हणाले.
