शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली होती…
त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ अशा १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील (BJP) अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून हा विस्तार छोटेखानी राहणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा व शिवसेनेचे (शिंदे गट) चार जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे चार कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच उरलेली रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भरली जाऊ शकतात. तर ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही त्यांची एखाद्या महामंडळावर नियुक्ती केली जाऊ शकते. हा शपथविधी शिवसेनेच्या वर्धापनदिना आधी म्हणजेच १९ जूनच्या अगोदर होण्याची शक्यता आहे.
