राष्ट्रवादीच्या २ नेत्यांवर अन्याय झाला, भाजप नेत्याचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे.

पण त्यांच्या याच निर्णयावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच मागे वाय. बी. चव्हाण सेंटरला जे घडलं ते तमाशाचं वगनाट्य होतं, अशीही टीका बावनकुळे यांनी यावेळी केली.

जसं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंशिवाय दुसरं कुणी चालत नाही, तसं शरद पवार यांना मुलगी सुप्रिया सुळे यांच्याशिवाय कुणी चालत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“मी अजित दादा यांच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. कारण अजित दादा हे खऱ्या अर्थाने त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी ते ठरवायचं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची निवड महाराष्ट्राकरता बरी झाली असती.

मला अजित पवार यांच्या नाराजीबद्दल काही माहिती नाही. मला त्यांच्या नाराजीबद्दल काही सांगायचं नाही. पण मला एवढं माहिती आहे की, अजित दादा कार्यक्षम आहेत. छगन भुजबळ कार्यक्षम आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Leave a Comment